हिंगोली -शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरने जागतिक रक्तदातादिनी जीवनामध्ये रक्तदानाचे महत्त्व दाखवून दिले आहे. डॉक्टराचे वय ५२ वर्षे असून त्यांनी आतापर्यंत ५४ वेळा रक्तदान केले आहे. डॉक्टर श्रीनिवास कंदी असे या रक्तदाता डॉक्टरांचे नाव आहे.
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त चौधरी पेट्रोल पंप परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक नेत्यांनी ही रक्तदान केले आहे. मात्र वयापेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्या डॉक्टरची जिल्हाभर चर्चा होत आहे.
कौतुकास्पद.! वया पेक्षा रक्तदानाचाच आकडा जास्त; तब्बल ५४ वेळा रक्तदान करणारा डॉक्टर
डॉक्टर श्रीनिवास कंदी हे वयाच्या १९ व्या वर्षापासून रक्तदान करत आहेत. डॉक्टर श्रीनिवास हे वर्षातून तीनदा रक्तदान करतात. 'रक्तदान केल्याने माझ्या आरोग्यावर काहीही दुष्पपरिणाम होत नाही. रक्तदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. आणि सर्वांनी केलेच पाहिजे. आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याला जीवदान मिळते' असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. मात्र जागतिक रक्तदाता दिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामुळे शासकीय रक्तपेढीमध्ये मुबलक प्रमाणात रक्तपिशव्या उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.