हिंगोली - आज राज्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्याच धर्तीवर हिंगोली येथे ही आरोग्य विभागाच्यावतीने लसीकरण मोहीम राबवून ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजला जात आहे. मात्र, हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मेट्रन मीना मस्के यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिओ लसीकरणाच्या जनजागृतीसाठी साकारलेली रांगोळी सर्वांचेच आकर्षण ठरली आहे. प्रमुख पाहुण्याकडूनही रांगोळी साकारणाऱ्यांचे कौतुक होत आहे.
पोलिओ जनजागृतीसाठी साकारलेली रांगोळी ठरली सर्वांचे आकर्षण - Hingol
हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने राबवण्यात येत आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात १ लाख ४९ हजार १०५ बालकांना जिल्ह्यातील १ हजार ७० बुथवरून पोलिओ डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्यावतीने केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने राबवण्यात येत आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात १ लाख ४९ हजार १०५ बालकांना जिल्ह्यातील १ हजार ७० बुथवरून पोलिओ डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्यावतीने केले आहे. यासाठी जिल्ह्यात २ हजार ८१० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा परिषद अध्यक्षा शिवरणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरीप्रसाद श्रीवास, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. मंगेश टेहरे, तालुका आरोग्यधिकारी सतीश रूणवाल , मेट्रन मीना मस्के, ज्योती पवार आदींची उपस्थिती होती. सकाळ पासूनच जिल्हासामान्य रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झाली होती. रुग्णालयातील चिमुकल्यांना ही पोलिओ डोस दिला.
'बाळाला करून घ्या प्रत्येक वेळी लसीकरण, नक्कीच मिळेल प्रत्येक आजारापासून संरक्षण', असे घोषवाक्य आहे. ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याचे आव्हान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. एच. पी. तुमोड, जिल्हा आरोग्यधिकारी शिवाजी पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सतिष रुणवाल यांनी केले आहे. जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्यकेंद्र, १३२ आरोग्यउपकेंद्र, अंगणवाडी केंद्रावरून ही मोहीम राबवली जाणार आहे. ग्रामीण भागात १ लाख १२ हजार ६१४ बालकांची संख्या असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगितले. जिल्ह्यातील एकही बालक विसरून राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.