महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चक्क गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसविले डुक्कर; हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेचे अनोखे आंदोलन - शिवसैनिकांनी

दुपारचे बारा वाजले तरी गटविकास अधिकारी कार्यालयात दाखल न झाल्याने शिवसेनेने चक्क गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीवर डुक्कर बसवून त्यांचा निषेध व्यक्त केला.

शिवसेनेने पंचायत समितीत अनोखे आंदोलन केले

By

Published : Jun 19, 2019, 8:17 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव येथील पंचायत समिती नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहते. विशेष म्हणजे येथील गट विकास अधिकारी येईल तो कामचुकार असल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेना नेहमीच आगळेवेगळे फंडे आजमावत आंदोलन करते. दुपारचे बारा वाजले तरी गटविकास अधिकारी कार्यालयात दाखल न झाल्याने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी चक्क गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीवर डुक्कर बसवून त्यांचा निषेध व्यक्त केला.

शिवसेनेने पंचायत समितीत अनोखे आंदोलन केले

सेनगाव पंचायत समितीमधील गट विकास अधिकारी नेहमीच वेळ मारून पंचायत समितीमध्ये कामासाठी येणाऱ्यांना ताटकळत ठेवतात. एका कामासाठी वारंवार यावे लागते. पंचायत समितीमध्ये कधी एक कर्मचारी हजर असतो तर दुसरा नसतो. कधी कधी तर गटविकास अधिकारीच हजर नसल्याने, येथे कामानिमित्त येणाऱ्यांना कित्येक वेळा रिकाम्या हाताने परतण्याची वेळ येते. अनेकदा या पंचायत समितीमध्ये अनोखे आंदोलन करून अधिकारी कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला आहे. मात्र, याचा काहीही परिणाम होत नसल्यानेच शिवसेनेने हे अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. शिवसैनिकांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकाऱ्यांच्याही रिकाम्या खुर्च्यांवर डुक्कर बसवित निषेध नोंदविला.

अनेक दिवसांपासून सेनगाव येथील पंचायत समितीचा कारभार ढेपाळला आहे. त्यामुळे कामानिमित्त येणाऱ्यांची हेळसांड होत आहे. एवढे करूनही भविष्यात हीच स्थिती राहिली तर शिवसेना स्टाईलनेच याहूनही आगळे वेगळे आंदोलन करत जाब विचारला जाईल, असा शिवसेनेच्या वतीने इशारा दिला.

हिंगोली येथे बैठक असल्याने सेनगाव येथे येण्यास उशीर झाल्याचे गट विकास अधिकारी किशोर काळे यांनी फोनवरून सांगितले. तसेच यासाठी असे अनोखे आंदोलन करण्याची काही गरज नव्हती. मला साधा फोन जरी केला असता तर मी कुणाचे काम थांबू दिले नसते, असेही आम्ही जनतेच्या कामासाठीच असल्याचे काळे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details