हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चोरट्यांचा धुमाकूळ एवढा वाढला आहे, की चोरटे एका रात्रीत सात ते दहा दुकाने फोडून पोलिसांना जणू आव्हानच देत आहेत. अशीच घटना पुन्हा एकदा औंढा तालुक्यातील जवळाबाजार येथे सोमवरी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेत ऐवज लंपास केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी मोठ्याप्रमाणात धुमाकूळ घातला आहे. दुकाने फोडून ऐवज पळविण्याचे प्रकार वाढले आहेत. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत डोंगरकडा, वारंगा फाटा व आखाडा बाळापूर येथे एकाच रात्री भुसार विक्रीची सात दुकाने फोडून चोरट्यांनी पंधरा दिवसांपूर्वीच पोलिसांना आव्हान दिले होते.
याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी औंढा तालुक्यातील जवळा बाजारकडे आपला मोर्चा वळवला अन आज पहाटेच्या सुमारास सात दुकाने फोडून हजारोंचा ऐवज पळवला. यामध्ये गजानन कन्फेक्शनरी, लक्ष्मण डफडे किराणा दुकान, शिवशाही कलेक्शन कापड दुकान, संदीप ढाबा, सावनी ड्रेसेस, राधिका जनरल स्टोअर्स, चव्हाण मेडीकल या दुकानांत हात साफ केला आहे. चोरट्यांनी या दुकानांतून रोख रक्कम पळवली. या प्रकाराने व्यापाऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा प्रकार सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी व्यापार यामधून होत आहे.