हिंगोली- उपप्रादेशिक परिवहन व शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवूनही जिल्ह्यात अपघातांचे सत्र कायम आहे. अवघ्या चार महिन्यात १०१ अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. तर मागील वर्षी ३१३ अपघातात १३१ जणांचा बळी गेला आहे. लाखो रुपये खर्च करून राबविलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाचा उपयोग तरी काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
रस्त्यावरील अपघात टाळता यावेत म्हणून उपप्रादेशिक परिवहन व वाहतूक शाखेच्या वतीने वर्षाच्या सुरुवातीलाच रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर लाखो रुपयांचा खर्चही केला जातो. यामध्ये अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी अन् अपघात घडल्यानंतर जखमीला स्टेचर वरून रुग्णालयात पाठविण्याची पद्धतही सांगितली जाते. शिवाय दारू पिऊन वाहने न चालविण्याचेही या अभियानात मार्गदर्शन केले जाते. अपघात टाळण्यासाठी जनजागृती होत असली तरीही हाती आलेल्या आकडेवारीवरून याचा कितपत उपयोग झाला असावा हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष करून जानेवारी ते मार्च या कालावधीतच सर्वाधिक जास्त अपघात झाल्याचे समोर आले आहे. या कालावधीत लग्न समारंभ आणि शाळेला सुट्ट्या लागल्याने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. त्यातच नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने पळविले जात आहेत. त्यामुळे बर्याच वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघातास कारणीभूत ठरत आहेत.