हिंगोली -जिल्ह्यातील सार्वजनिक दसरा महोत्सवात रावण दहनाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी हातात धनुष्यबाण घेऊन रावण दहन केले. धनुष्यबाण हे शिवसेना या राज्य मान्यताप्राप्त पक्षाचे चिन्ह आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यावर आचारसंहिताभंग व निलंबनाची कारवाई करावी, अशी ऑनलाईन तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी हिंगोली येथे दसरा महोत्सवाची 165 वर्षाची परंपरा आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात हिंगोलीतील सार्वजनिक दसरा महोत्सव हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक आणि दसरा महोत्सव सोबत आल्यामुळे महोत्सवाची संपूर्ण जबाबदारी खाकी बाबा मठाकडे सोपवण्यात आली होती.
हेही वाचा - दहावीत नापास झाल्याने युवतीची आत्महत्या, हिंगोलीतील घटना
परंपरेनुसार रावण दहन सुरू असताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी धनुष्यबाण हातात घेऊन, रावणाकडे निशाण साधला. याचा व्हिडीओ विविध माध्यमावर प्रसारित झाला तर वर्तमान पत्रात फोटो प्रकाशित झाले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अॅड. विजय राऊत यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन तक्रार केली. यावर कोणतीही कारवाई न केल्यास पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशाराही राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा - गेल्या पाच वर्षात भाजपने केवळ विविध धर्मांत तेढ निर्माण केली - अशोक चव्हाण
या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धनुष्यबाण घेऊन रावण दहन करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर निवडणूक विभाग काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.