हिंगोली - पोलीस दलातील बदलीची पहिली यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी हे आदेश काढले आहेत. यामध्ये काही प्रशासकीय कारणावरून तर काही अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून बदल्या झालेल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी हिंगोली पोलीस प्रशासनामध्ये 'कभी खुशी कभी गम' अशी परिस्थिती दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, हिंगोली कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची प्रशासकीय कारणावरून हट्टा येथे तर, वसमत शहरचे सय्यद आजम सय्यद युसूफ यांच्या जागीच सेवानिवृत्तपर्यंत मुदतवाढ केली आहे. वाचक शाखेचे सदानंद राव येरेकर यांची विनंतीवरून कुरुंदा येथे बदली केली तसेच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांचीही विनंतीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बदली केली आहे.
हिंगोली येथील नियंत्रण कक्षातील उदय खंडेराय यांची विनंतीवरून वसमत शहरात बदली केली आहे. बाळापूरच्या पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर यांची प्रशासकीय कारणावरून हिंगोली ग्रामीण, तर वाचक शाखेचे प्रकाश अवचार यांना आहे त्याचठिकाणी मुदतवाढ दिली आहे. कळमनुरी पोलीस ठाण्याचे शिवसांब घेवारे यांची हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेत प्रशासकीय कारणावरून तर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे शंकर पांढरे यांची वाचक शाखेत बदली करण्यात आली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे राहुल तायडे यांची विनंतीवरून औंढा पोलीस ठाण्यात तर हिंगोली ग्रामीणचे किशोर पोटे यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात प्रकाश सरोदे यांची प्रशासकीय कारणावरून वसमत येथील वाचक शाखेत तर तुळशीराम गुहाडे यांची प्रशासकीय कारणावरून वाचक शाखेत बदली झाली आहे.
पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंती किंवा प्रशासकीय कारणावरून बदल्या झाल्यामुळे काही प्रमाणात पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी ज्या ज्या पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत तेथील पदभार लवकर स्वीकारण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत.