हिंगोली- दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर शहरात निर्माण झालेला तणाव आणि दगंलसदृश स्थितीला पोलिसच जबाबदार आहेत का ? असा सवाल शहरातील नागरिकांना पडला आहे. सदरील तणावाच्या परिस्थितीमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज पाहून घटनेला पोलीस प्रशासनच जबाबदार असल्याचे वेगवेगळ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यामुळे हिंगोलीचे पोलीस प्रशासन रक्षक आहे की भक्षक, असा प्रश्न समोर येत आहे.
हिंगोलीत दरवर्षी ओम कयाधु अमृत धारा महादेव मंदिर येथून कावड काढली जाते. त्यामुळे यंदा कावड आणि ईद एकाच दिवशी असल्याने पोलीस प्रशासनाचे वाढीव पोलीस बंदोबस्त लावणे गरजेचे होते. मात्र, पोलिसांनी जादा पोलिसांचा बंदोबस्त लावला नाही. तर पोलीस कर्मचारी व दंगा नियंत्रण पथकाने या घटनेनंतर शहरात नागरिकांचा पाठलाग करून रस्त्यावर दिसेल त्याच्यावर लाठीचार्ज केला. घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांची देखील तोडफोड केली. हे पथक एवढ्यावरच थांबले नाही. बंद घरावर ही दांडे मारले, घरासमोरील लाईट फोडले. नेहमीच कायद्यावर बोट ठेवून चालणाऱ्या पोलिसांचा हा हैवानी प्रकार घराला सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.