हिंगोली- वसमत येथील शिवा सौदा या युवकाचा रविवारी रात्रीच्या सुमारास खून झाला होता. यात सहा जणांविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वसमत शहरात बंद पाळला जात होता. मात्र, बरेच दुकानदार, व्यावसायिक बंदला प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आज दुपारून अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वसमत येथे ठिकठिकाणी दगडफेक; शहरात तणावाचे वातावरण या दगडफेकीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही काही घरांचे व वाहनांचे नुकसान झाले. पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वसमत शहराला छावणीचे रूप आले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी रस्त्यावर दिसेल त्याला पोलीस ताब्यात घेत होते.
वसमत येथील मामा चौकात व शहरातील इतर काही भागात अज्ञात टोळक्यांनी अचानक घरावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. घरावर दगडफेक होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या दगडफेकीमध्ये दोन ते तीन दुकाने व एका खासगी दवाखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात पोलीस प्रशासनाच्यावतीने जागोजागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिथे कुठे टोळके दिसत होते त्या टोळक्याचा पोलीस पाठलाग करत त्याना ताब्यात घेत होते. याप्रकाराने वसमत येथे काही काळ चांगलाच तणाव झाल्याचे दिसून आले. तसेच शहर पोलीस ठाण्यातदेखील युवकांनी गर्दी केली होती.
या प्रकरणी अजून कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, दगडफेकीमुळे अनेक जण भयभीत झाले होते. पोलीस दगडफेक करणाऱयांचा शोध घेत आहेत.