हिंगोली -रेल्वेने प्रवास करताना कळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर, लहानशी चूक जीवावर बेतण्याची शक्यता असते. अशाच एका प्रवाशाला धावती रेल्वे पकडणे चांगलेच जीवावर बेतले. इतर, प्रवाशांच्या प्रसंगावधानाने चेन ओढून रेल्वे थांबविण्यात आली. त्यामुळे या प्रवाशाचा जीव वाचला, मात्र त्याला आपला कान गमवावा लागला. हा थरारक प्रकार पाहून हिंगोली रेल्वे स्थानकावर एकच आरडाओरडा झाला होता. मुकुंद श्रीनिवास पुरोहित (35) रा. देवडा नगर हिंगोली अस जखमी प्रवाशाचे नाव आहे.
पुरोहित हे हिंगोलीच्या स्थानकावर पूर्णा-अकोला मार्गे जाणारी प्रवासी रेल्वे पकडण्याच्या धावपळीत होते. ही रेल्वे स्थानकावरून हळू-हळू निघू लागली तोच पुरोहित रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारातून धावत आत आले आणि धावपळीत रेल्वे पकडण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान, रेल्वेची गती वाढल्याने चढण्याच्या प्रयत्नात पुरोहित यांचा पाय घसरला. ते फलाटावर रेल्वेसोबतच फरफटत गेले. सदर बाब प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीची साखळी ओढली.
गाडी वेळीच थांबल्यामुळे पुरोहित यांचा जीव वाचला मात्र, ते वेदनेने जोरजोरात विव्हळत होते. हा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण पाहून हिंगोली रेल्वे स्थानकावर एकच आरडाओरड झाली. जखमी अवस्थेत असलेल्या पुरोहितांना रेल्वे पोलिसांनी व नागरिकांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.