हिंगोली -अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मानव अहोरात्र प्रयत्न करतो, अन् त्या पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतो. मात्र, उत्तर प्रदेशातून दाखल झालेल्या कुटुंबाचा रस्त्यावरील संगीतच पोटाची खडगी भरण्याचा आधार बनला आहे. मात्र, ऑपरेशन मुस्कान अंतर्गत या बालकांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निकिता जब्बार राठोड (८), जानवी कैलास राठोर(४), गोविंद राठोर(५), आर्या गोविंद राठोर(५), धरम गोविंदा राठोर (१) अशी ताब्यात घेतलेल्या बालकांची नावे आहेत.
दिलीप कुमार असे या कुटूंब प्रमुखाचे नाव आहे. हे कुटूंब उत्तरप्रदेशमधील आझमगड येथील रहिवासी आहे. घरात आठरा विश्व दारिद्र्य अशा परिस्थितीत दिलीप कुमार यांनी संसाराचा गाडा हकण्यासाठी रस्त्यावर संगीत वाजवून खेळ दाखवण्याची सुरुवात केली. दिलीपच्या वडिलांचा देखील हाच व्यवसाय होता, ते बघतच दिलीप हे सर्व काही करू शकला आहे. दिलीप अन् त्याची बहिण हे काम करतात. दिलीपची बहिण ही उत्कृष्ट बँजो वाजवते तर दिलीप स्वतः तबला, ढोलकी वाजवतात. तसेच दिलीपची बहिण गुड्डी ही उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक कसरत करते. बँजो अन् ढोलकीच्या तालावर ती कसरत पाहून, तिला बक्षीस रूपात कधी १० तर कधी २० रुपये मिळतात आणि यातुनच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
हेही वाचा -हिंगोलीत रिमझिम पावसाची हजेरी; रब्बी पिकांना होणार फायदा
एकीकडे वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्याच्या तयारीत सर्वजण लागलेले आहेत. प्रत्येकजण आपापल्यापरिने नवीन वर्ष साजरा करण्याच्या तयारीत आहे. मात्र, हे कुटुंब रस्त्यावर संगीत वाजवून संध्याकाळच्या भाकरीची व्यवस्था करण्यासाठी धडपडत आहे. कसरत करणाऱ्या गुड्डीला शिक्षणाचा जराही गंध नाही, ती जर शाळेत गेली तर मग परिवाराच्या रोजी रोटीचा प्रश्न उपस्थित होईल असे दिलीप यांना वाटते. गुड्डीला शिकवण्याची खूप इच्छा आहे मात्र, तिने कसरत केलीच तर आमचं कुटुंब चालते अन्यथा उपाशी दिवस ढकलल्याशिवाय पर्यायच नाही असे दिलीप सांगतात. यावरून आजही पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबाला कशी कसरत करावी लागते हेच यावरून दिसून येत आहे.