हिंगोली - जिल्ह्यात मुंबईच्या डोंबिवलीहून आपल्या गावी परतलेल्या कुटुंबाला ग्रामसुरक्षा दल यासह आदींनी त्यांची सर्वप्रथम तपासणी करून विलगीकरण कक्षात जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या कुटुंबाने त्याला स्पष्ट नकार दिला. ही बाब प्रशासनाला कळल्यानंतर या कुटुंबाला पोलीस बंदोबस्तात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविल्यानंतर एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे, गावात खळबळ उडाली. त्यामुळे सदर कुटुंबाविरुद्ध नरसी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक मीनाक्षी पंडितकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्याचे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. त्यामुळे, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी आधी तपासणी करावी अशा सूचना जिल्हा प्रशासन वारंवार देत आहे. सदर कुटुंब हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई येथील डोंबिवलीमध्ये कामानिमित्त स्थलांतरित झालेले आहे. मात्र, लॉकडाऊन झाल्यानंतर याठिकाणी हाताला काम नसल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती त्यामुळे या कुटुंबांनी घराकडची वाट धरली. सदर कुटुंब हे हनवत खेडा येथील रहिवासी असून ते 25 जूनरोजी रात्री सात वाजता गावामध्ये दाखल झाले होते.
हे कुटुंब गावात दाखल होतात त्यांच्याजवळ ग्राम समितीने धाव घेऊन सदरील कुटुंबातील सदस्यांना शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यासाठी विनवणीवजा सूचना केल्या होत्या. मात्र, या सदस्यांनी त्या सूचनेकडे दुर्लक्ष करत गावातीलच शाळेमध्ये क्वारंटाईन राहिले होते. त्यांना समिती व ग्रामसेवक वारंवार तपासणी करून घेण्यासंदर्भात सूचना देत होते. मात्र, ते ग्रामसेवकासोबतच अरेरावीची भाषा वापरत होते. शेवटी 29 जूनरोजी या सर्वांना हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात शासकीय रुग्णवाहिकेद्वारे नेऊन तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले असता त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे, गावात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, वेळोवेळी शासनाच्या वतीने सूचना देऊन देखील त्या सूचनांचे पालन न केल्याने या कुटुंबाविरुद्ध नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वास्तविक पाहता मोठ्या संख्येने नागरिक मुंबई, पुणे, नाशिक आदी ठिकाणाहून आपल्या मूळगावी परतत आहेत. मात्र, गावी परतल्यानंतर शासनाच्या आदेशाचे पालन न केल्याने किती भयंकर प्रकार घडू शकतो हे या प्रकारावरून समोर आले आहे. त्यामुळे पर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येकाने विलगीकरण कक्षात दाखल होऊन स्वतः ता तपासणी करून घेण्यात यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.