हिंगोली -सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट असताना आता जनावरांमध्येही एक संसर्गजन्य रोग आढळून आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून काही भागांमध्ये जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र, पशुपालकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. आज पोळा असल्याने गुरे एकमेकांच्या संपर्कात येऊ देऊ नका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत आपण आपली गुरे इतर गुरांच्या संपर्कात येऊ नका, असे आवाहन पशुवैद्यकीय डॉक्टर डी. सी. कुंधारे यांनी केले.
'लॅम्पी स्किन डिसीस' असे या आजाराचे नाव असून हा आजार पूर्णपणे संसर्गजन्य आहे. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात गुरे आली तर हा आजार एका गुरापासून दुसऱ्या गुरांना होण्याची दाट शक्यता आहे. याची लक्षणे म्हणजे गुरांच्या अंगावर बारीक-बारीक पूरळ येऊन त्यातून पिवळसर रंगाचा द्रव बाहेर पडतो. त्यामुळे गुरांच्या अंगावर माशा बसल्याने त्या माशांद्वारे हा आजार इतर गुरांना होतो. सध्यातरी हा आजार जिल्ह्यातील काही भागांमध्ये आढळून येत असून या आजारापासून आपल्या गुरांची सुटका करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलेल्या सूचनांचे पालन करण्याची नितांत गरज आहे.
हेही वाचा -मिरजेत कृष्णा नदीतील पाणी पात्राबाहेर, नागरिकांचे जनावरांसह स्थलांतर सुरू