हिंगोली- संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिमांसह विविध समाजातील बांधवांच्या वतीने नागरिकत्व सुधारणा दुरुस्ती कायद्याला विरोध केला जात आहे. हिंगोलीतही मुस्लीम बांधवांच्या वतीने या कायद्याच्या विरोधात गांधी चौक येथे मागील पाच ते सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. तर आज (दि. 19 जाने.) महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. ईदगाह मैदानावर महिलांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
हिंगोलीतील मुस्लीम महिलांच्या वतीने काढलेल्या मोर्चात महिला मुला-बाळांसह मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 'जब तक जनता भुकी है, ये आझादी झुठी है', इन्कलाब जिंदाबाद, 'संविधान की खातीर जिंदा है जनता' आदी संदर्भात मुस्लीम महिलांनी घोषणाबाजी केली. महिला मोठ्या आक्रमक झाल्या होत्या. तर वसमत येथे देखील महिलांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.