हिंगोली - नेहमीच दारुच्या नशेत आई-वडिलांशी वाद घालणाऱ्या मुलाचा सेवानिवृत्त शिक्षकाने दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना 24 मे रोजी रात्री वसमत शहरात घडली. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात पत्नी सुमन चव्हाण यांच्या तक्रारीवरुन पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
वसमतमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाकडून दारुड्या पुत्राची हत्या
दारुच्या नशेत आई-वडिलांशी वाद घालणाऱ्या मुलाचा सेवानिवृत्त शिक्षकाने दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना 24 मे रोजी रात्री वसमत शहरात घडली.
उमेश उत्तम चव्हाण असे मृताचे नाव आहे. उमेश हा नेहमीच दारू पिऊन आई-वडिलांसोबत वाद घालत होता. अनेकदा आई-वडिलांनी त्याला समजून देखील सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्यावर काही परिणाम होत नव्हता. शेवटी 24 मे रोजी उमेश रात्री दारू पिऊन आला आणि त्याने आई-वडिलांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली हा वाद एवढा विकोपाला गेला की. वडिलाने त्याचा दोरीने गळफास लावून खून केला.
ही घटना कोणालाही कळू नये म्हणून मुलाचा मृतदेह तसाच घरामध्ये ठेवला होता. दोन दिवसानंतर परिसरात दुर्गंधी सुटल्याने शेजारी असलेल्या काही नागरिकांनी घरामध्ये जाऊन पाहिले तर मुलाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पित्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.