हिंगोली- हिंगोली विधानसभा मतदारसंघातील चिंचोली निळोबा येथे आज कावड यात्रा निघाली होती. यावेळी ही यात्रा इदगाह मैदानाजवळ आल्यानंतर काही जणांनी वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये 25 ते 30 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिस्थिती पाहता पोलीस प्रशानाने कावड स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी शांततेत कावड नेण्याचे आवाहन केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली असून पोलीस बंदोबस्तामध्ये कावड कलमनुरीकडे रवाना केली आहे.
हिंगोलीत दोन गटात राडा : कावड यात्रा शांततेत काढण्याचे खासदार पाटलांचे आवाहन - kawad Yatra
या घटनेवरून परिस्थिती नियंत्रणात असली तरी दिवसभर हिंगोली शहरात वातावरण तापलेले आहे. तर पोलीस कर्मचारी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यामुळे शहरातील सर्व दुकानेही बंद ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हिंगोलीतील कयाधू नदी तीरावरील ओम कयाधू अमृतधारा महादेव मंदिर येथून दरवर्षी कावड यात्रा काढली जाते. यावर्षीही कळमनुरीकडे कावड रवाना असताना इदगाह मैदानावरजवळ दोन गटामध्ये राडा झाला. त्यामुळे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज केला. यामध्ये राड्यामध्ये 10 ते 15 जण जखमी झाले आहेत. जवळपास 18 ट्रकने ही कावड कळमनुरीकडे रवाना होत होती. त्यावेळी ही घटना घडली.
खासदार हेमंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाला आम्ही कावड शांततेत नेणार असल्याचे सांगितले. शिवाय जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी देखील कावड शांततेत नेणार असल्याचे सांगितले. त्यावरून कावडीत सहभागी झालेल्या युवकांना जिल्हाप्रमुख बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांनी शांततेचे आवाहन केले. त्यानंतर पोलीस संरक्षणात कावड कळमनुरीमार्गे रवाना झाली.