हिंगोली- खासदार हेमंत पाटील हे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून जिल्ह्यात फिरकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. एवढेच नव्हे तर ते हरवल्याची तक्रार देखील पोलीस अधीक्षकांकडे केली होती. मात्र, आज (बुधवार) खासदारांनी हिंगोली जिल्ह्यात धाव घेऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून दिल्या शिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
हिंगोली जिल्ह्यात सलग नऊ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासन स्तरावर जरी पंचनामे सुरू असले तरी ही खासदार हेमंत पाटील शेकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यात कुठे ही फिरले नसल्याने, नागरिक व शेतकऱ्यांतून नाराजीचा सुर निघत होता. मात्र, आज खासदार हेमंत पाटील यांनी सेनगाव व कळमनुरी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळून देण्याचा आश्वासनही दिला. सोबत कळमनुरीचे नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्यासह तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती. तर प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना ही दिल्या.