हिंगोली- सेनगाव तालुक्यातील तळणी येथील चाळीस एकरात एका वानराने शेतकरी आणि ट्रॅक्टर चालकांना सळो की पळो करून सोडले आहे. शिवारात ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना वानर चांगलेच त्रास देत आहे. या वानराच्या हैदोसामुळे गुरुवारी एक ट्रॅक्टर पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे. पावसाला चांगली सुरवात झाल्याने शेतकऱयांना पेरणीची घाई झालेली आहे. पण वानाराच्या भितीमुळे शेतकरी आणि ट्रॅक्टर चालक या भागात पेरणी करण्यासाठी घाबरत आहेत. घडलेल्या घटनेमुळे वनविभागाने देखील याची दखल घेतली आहे. वानर पकडण्यासाठी एक पथक शनिवारी वनविभागाकडून शिवारात दाखल झाले होते. पथकानी दुपारपर्यंत मोव्हडी परिसरात ट्रॅक्टर चालवून वानराचा तपास केला मात्र वानराचा पत्ता न लागल्यामुळे पथक शेवटी रिकाम्या हाताने परतले.
वानराच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त; वनविभागाचे पथक रिकाम्या हाताने परतले
सेनगाव तालुक्यातील तळणी परिसरात वानराच्या हैदोसामुळे अनेक शेतकऱयाच्या पेरण्या रखडल्या आहेत. वनविभागाला देखील वानराचा बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे.
तळणी परिसरात वानराची दहशत प्रचंड वाढलेली आहे. वानराच्या भीतीपोटी या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन पेरण्याचा विचार सोडून दिलेला आहे. वानराचा बंदोबस्त केला तरच आम्हाला पेरणी करणे शक्य होईल, कारण या वानराच्या भितीमुळे या भागात ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर चालवण्यासाठी स्पष्ट नकार दिला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर वानराला ताब्यात घेतल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा पावित्रा वन विभागाने घेतला असून, उद्या पुन्हा या वानराचा तपास घेण्यात येणार असल्याचे विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले. या वानराची सध्या हिंगोली जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगते आहे . आता किती दिवसात वन विभाग या वानराला ताब्यात घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.