हिंगोली :महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. या महामारीला हरवण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभाग अहोरात्र परिश्रम करत आहे. अशाच परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी महत्वाचे असलेल्या रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवू लागला आहे. मात्र हा तुटवडा भरून काढण्यासाठी आमदार संतोष बांगर हे धावून आले आहेत. इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी त्यानी 90 लाख रुपयांची एफडी मोडली आहे. याच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. मग या जनतेसाठी अडचणीच्या काळात धावून जाणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मानत हे धाडस केल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. यामुळे त्यांच्या या पुढाकाराची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. आज घडीला एक हजारच्या वर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांच्या वाढत्या तुलनेत इतर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत स्वतः कडून जेवढं शक्य आहे तेवढं करण्यासाठी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे धावून आले आहेत.
इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक-
रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी मेडीकल असोसिएशनची बैठक घेतली होती. बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या होत्या. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. त्यामुळे बांगर यांनी पुढाकार घेतला आणि इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः ची बँकेत असलेली 90 लाखांची ठेव मोडली. यामधून ते जिल्ह्यात इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर हेल्पलाईन म्हणून दिला आहे. त्यावर रात्री-अपरात्री कोणीही कोरोना वार्डमध्ये येत असलेल्या अडचणी संदर्भात मदत मागत आहेत. बांगर हे काही क्षणात फोन उचलून संबंधित डॉक्टर-नर्स यांना रुग्णांना सेवा देण्यासंदर्भात सूचना देत आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये आमदार संतोष बांगर हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या मोठ्या मनाचे कौतुक होत आहे.