हिंगोली - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रचंड हैराण आहेत. त्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे सोडून राज्य सरकार दुसरीकडे लक्ष घालत आहे. या सरकारला कंगना रणौत, सुशांतसिंह राजपूत, अर्णव गोस्वामी यांना तुरुंगात घालण्यात रस आहे. मात्र, आरक्षण मिळवण्यासाठी एवढा कालावधी लावला जात आहे. या सरकारपेक्षा तर तेव्हाचे मुघल परवडले, असा खरमरीत टोला आमदार नितेश राणे यांनी हिंगोलीतल्या ओंढा नागनाथ येथील सभेत महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असेही राणे म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यातील ओंढा नागनाथ येथे औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात असलेले भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ राणे बोलत होते. हे सरकार स्थापन होऊन वर्ष लोटले आहे. मात्र, या वर्षभरात या राज्य सरकारने कोणाची कामे मार्गी लावली आहेत? असा प्रश्न राणे यांनी विचारला. तसेच मुख्यमंत्र्यांना या प्रश्नावर लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. त्यांना वेळ आहे फक्त कंगना राणौत, सुशांतसिंह राजपूत, अर्णव गोस्वामी यांच्यामध्ये. तसेच गेल्या बारा वर्षापासून असलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार यांनी देखील त्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याचे नितेश राण म्हणाले.
वकीलच वेळेवर पोहोचत नाहीत
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जेव्हा-जेव्हा आरक्षणाची तारीख येते तेव्हा-तेव्हा यांचे वकीलच तेथे पोहोचत नाहीत. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे हे सरकार मराठाद्वेशी सरकार आहे. सामनाचे कार्यकारी संपादक असताना उद्धव ठाकरे यांनी आमच्या माता-भगिनींना मूक मोर्चा म्हणून त्यांना अपमानित केले होते. तर, या सरकारकडून आरक्षणाची काय अपेक्षा करणार, असेही राणे म्हणाले.