हिंगोली - सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी चोरट्याने व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात व्यापारी जखमी झाला आहे. सत्यनारायण कचरूलाल झंवर, असे हल्ला झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात चोरी आणि लुटमारीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषतः सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक जास्त लुटमारीच्या घटना घडत आहेत. तरीही पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात अपयश येत आहे.
शनिवारी रात्री नेहमी प्रमाणे व्यापारी झंवर हे आपले जनरल स्टोअर्स बंद करून दुचाकीने घरी जात होते. घराजवळ पोहचले तोच दुचाकीवर आलेल्या चोरट्याने झंवर यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी व्यापाऱ्याने आरडा-ओरड करत बॅग देण्यास विरोध केला. मात्र, चोरट्याने त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुःखात झाली. मात्र, त्यानी हातची बॅग सोडली नाही. आरडाओरडा केल्याने घरातील मंडळी आणि नागरिकांनी धाव घेतली तोपर्यंत चोरट्याने पळ काढला.
झंवर यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हाताला पंचवीस टाके पडले आहेत. चोरट्यांचा वाढत्या हल्ल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ सेनगाव येथे व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. हल्ला प्रकरणी रात्री उशिरा कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.