हिंगोली- येथील नगर पालिकेच्या कल्याण मंडपममध्ये शुक्रवारी पाणीटंचाई प्राधान्य बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला बऱ्याच गावातील सरपंचानी दांडी मारल्याचे पाहावयास मिळाले. प्रशासनाच्या भरडघाईला तर कंटाळून सरपंचाने दांडी मारली नसावी? याचीच चर्चा दिवसभर होती. तर टँकर प्रस्तावित असलेल्या गावात अजून टँकर पोहोचले नसल्याचेही वास्तव समोर आले आहे.
पाणीटंचाई प्राधान्य बैठकीला बऱ्याच गावातील सरपंचांची दांडी यामध्ये उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, तहसीलदार गजानन शिंदे, तालुका आरोग्यधिकारी सतीश रुनवाल आणि विद्युत महावितरण कार्यालयाचा एका प्रतिनिधीची उपस्थिती होती.
यावेळी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मुकुंद कारेगावकर यांनी नेहमीप्रमाणे टंचाई आराखडा वाचून दाखवला. नंतर टंचाई असलेल्या गावातील ग्रामसेवक यांच्याकडून आढावा घेण्यात आला. तर त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तलाठी, ग्रामसेवकांना दिल्या. तसेच ज्या गावात अधिग्रहण केलेले विहीर किंवा बोअरची पाणी पातळी खालावली असेल तर ताबडतोब प्रशासनास कळविण्याची तंबी ग्रामसेवक, तलाठ्यांना दिली.
या बैठकीला भूजल विभागाचा कोणताही अधिकारी दिसून आला नाही. या विभागामार्फत टंचाईग्रस्त गावात बोअर घेण्याचे नियोजन दाखविले जाते. नियोजनानुसार तरी एखाद्या गावात घेतलेल्या बोअरमुळे पाणी टंचाईवर मात करणे शक्य होऊ शकते. मात्र, अशा वेळीही ही यंत्रणा येतच नाही. तसेच पार पडलेल्या बैठकीस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता, गटविकास अधिकाऱ्यांची देखील अनुपस्थिती होती.
विशेष म्हणजे प्रशासन जरी टंचाई निवारण करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी बऱ्याच गावात अजून टँकर पोहोचलेले नाही. मुख्य म्हणजे हिंगोली शहराला लागूनच असलेल्या गंगानगर भागात टँकर मंजूर आहे. मात्र, अधिग्रहण करण्यासाठी बोअर किंवा विहिरच मिळत नसल्याने टँकर मंजूर होऊनही काही उपयोग नसल्याचे चित्र आहे.
तसेच पालक सचिव आणि पालकमंत्री यांनी देखील पाणी टंचाईचा आढावा घेऊन टंचाई निवारणासाठी जलद गतीने हालचाली करण्याचे निर्देश हिंगोली प्रशासनाला दिले आहेत. त्या निर्देशाचे पालन प्रशासन योग्य प्रकारे करते की नाही. हेच पाणी टंचाई निवारणावरून दिसून येणार आहे. तर वारंवार सूचनांच्या भडिमाराला कंटाळून तर बहुतांश सरपंचाने या बैठकीला दांडी मारली नसावी, असेही तर्कवितर्क लावले जात आहे.