महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत पहिल्याच पावसात वन विभागाचे पितळ उघड; पावसाने पाझर तलावाला लागली धार - lake constructed

हिंगोली जिल्ह्यात वनविभागाच्यावतीने बनविण्यात आलेल्या पाझर तलावाला धार लागल्यामुळे भविष्यात हा पाझर तलाव फुटू शकतो, अशी शक्यता परिसरातील शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.

तलावातून होत असलेली पाणी गळती

By

Published : Aug 2, 2019, 11:57 PM IST

Updated : Aug 3, 2019, 12:04 AM IST

हिंगोली-जिल्ह्यातील वन विभाग हा कधी वन्यप्राण्यांमुळे तर कधी जंगल तोडीमुळे चर्चेत असतो. मात्र, आता हा विभाग एका पाझर तलावाने चर्चेत आला आहे. वन विभागाच्या जागेत यावर्षी बनवलेला पाझर तलाव पाझरत असून जोरदार पाऊस झालेला नसताना ही त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पहिल्याच पावसाने वनविभागाचे पितळ उघडे पडल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहे.

तलावातून होत असलेली पाणी गळती

जिल्ह्यातील पहेनी परिसरात असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर वन विभागातर्फे ५ एकरमध्ये याच वर्षी पाझर तलावाचे खोदकाम केलेले आहे. अजून जिल्ह्यात जोरदार पाऊस ही झालेला नाही. जिल्ह्यात सरासरीच्या शेवटी ३०.२७ टक्के एवढी पावसाची नोंद झालेली आहे. अजून ही जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतीक्षा असतानाही वनविभागाच्यावतीने बनविण्यात आलेल्या पाझर तलावाला धार लागल्यामुळे भविष्यात हा पाझर तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा पाझर तलाव फुटल्यास जरी मनुष्यहानी आणि होणार नसली तरीही, शेतीपिकांचे मात्र अतोनात नुकसान होणार आहे. वन विभागाच्यावतीने बनविलेल्या या तलावाची पहिल्याच पावसात ही दशा झाली असेल तर जिल्ह्यात इतरही ठिकाणी खोदण्यात आलेल्या तलावाची काय दशा असेल हे वेगळ्या शब्दात सांगण्याची गरज नाही. तलावाच्या आजूबाजूला जेसीपीच्याद्वारे सांडवा खोदून तलावातील पाणी बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अजून हा तलाव भरलेला देखील नाही. यावरुन हे स्पष्ट होते, की या तलावाचे काम कोणत्या दर्जाचे झाले आहे.

या तलावाच्या भिंतीलाच धार लागल्याने परिसरातील शेतकरी चांगलेच भयभीत झाले आहेत. यदा कदाचित अजून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली तर ही भिंत फुटण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही. अल्पशा पावसानेच तलावात जो काही पाणीसाठा निर्माण झाला आहे, तोही पाणीसाठा जेसीबीच्या साह्याने सांडव्याद्वारे काढून देण्याची वेळ वन विभागावर आली आहे. वन विभागाचा हा प्रयत्न वन्यप्राण्यांसाठी मात्र चांगलाच गैरसोयीचा ठरणार आहे. मग लाखो रुपये खर्च करुन तयार केलेला तलाव काय उपयोगाचा ? असा सवाल आता परिसरातील शेतकरी उपस्थित करत आहेत.

Last Updated : Aug 3, 2019, 12:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details