हिंगोली- देवस्थानांना पशुबळी देण्याची परंपरा महाराष्ट्रात नवीन नाही. पण, आता लोक जागृत होत असून अशा प्रकारांना विरोध करू लागले आहेत. जिल्ह्यातील कोथळज गावातील नागरिकांनी गावात होणाऱ्या पशूहत्येला विरोध केला आहे. देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पुरी-भाजीचा प्रसाद वाटण्याचा पर्याय त्यांनी शोधला आहे. भाविकांकडूनही गावकऱ्यांच्या या उपक्रमाला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे.
पशुहत्येला विरोध करुन गावकऱ्यांनी पुरी भाजीचा प्रसाद सुरू केला आहे कोथळज येथे गैबू पिर हे देवस्थान आहे. सर्वधर्मीय भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी संदल हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. संदलच्या दिवशी बोकडाचा बळी देण्याची प्रथा ३ पिढ्यांपासून चालू आहे. लोकांची श्रद्धा असल्याने ही प्रथा वर्षानुवर्षे चालुच होती. पण, याचे दुष्परिणाम गावकऱ्यांना जाणवू लागल्याने त्यांनी याला विरोध करायला सुरुवात केली.
येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून बोकडाचा बळी दिली जातो. त्यामुळे परिसरात रक्ताचे पाट वाहतात. मोठ्या प्रमाणात रक्त साचल्याने आसपास दुर्गंधी पसरते. तसेच, घाण तयार होते. या घाणीमुळे गावात अनेक आजाराची लागण झाल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. रक्तामुळे पसरणारी दुर्गंधी अनेक दिवस जात नाही. हे बळी पाहिल्याने लहान मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे अशा बळींना विरोध करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला.
पशुबळीला पर्याय म्हणून गावकऱ्यांना भाविकांसाठी पुरी भाजीचा प्रसाद वाटप केला. याला भाविकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पण, अजूनही लोकांचा जुना समज जात नाही. काही लोक शेजारच्या शेतात जाऊन बळी देतात. त्यामुळे ही प्रथा समूळ कशी नष्ट करायची ? हा प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे. पशुहत्या कायम बंद करण्याचा प्रयत्न करु, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. महिला भाविक या बंदीचे स्वागत करत आहेत.