हिंगोली- केंद्र शासनाची अतिमहत्त्वाची योजना म्हणून जननी सुरक्षा योजनेकडे बघितले जाते. या योजनेअंतर्गत प्रारंभीच प्रसूती माता व गरोदर मातांना चांगला लाभही झाला. थेट घरापर्यंत गाडी पोहोचल्यामुळे प्रस्तुती माता व गरोदर मातांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र कालांतराने या योजनेतील रुग्णवाहिकांची दुरुस्ती न केल्यामुळे आज ह्या रुग्णवाहिका पूर्ण भंगार बनलेल्या आहेत. केव्हा कोठे दम तोडतील याचा काही नेमच नसल्याने चालकही या गाड्या चालवण्यासाठी धजावत नाहीत.
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील पाच ते सहा महिन्यापासून या योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेत जिल्हा सामान्य रुग्णालयाला मिळालेल्या तीन रुग्णवाहिकांची दयनीय अवस्था झालेली आहे. ज्या रुग्णवाहिकेने चिमुकल्यांसह बाळंत माता नेल्या जातात, त्या रुग्णवाहिकांचे टायर खराब झाले आहेत. काही रुग्णवाहिकांची चार ते पाच महिन्यापासून सर्व्हिसिंग केली नसल्याने त्या भंगार रुग्णवाहिका केव्हा, कुठे, दम तोडतील याचा काही नेमच नाही. अनेकदा गरोदर मातेला घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रुग्णवाहिका बंद पडल्याने त्या टोचन करूनही आणल्याचे दाखले येथील चालक सांगत आहेत. वरिष्ठांकडे कित्येकदा त्यांनी रुग्णवाहिका दुरुस्तीची मागणी केली, मात्र त्याला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. एवढेच नव्हे, आता तर दुर्दैवाची बाब म्हणजे डिझेल अभावी जननी शिशु योजनेच्या रुग्णवाहिका बंद अवस्थेत आहेत.
रुग्णवाहिकांना साधे लाईट देखील नाहीत. तरीही अशाच अवस्थेमध्ये चालकांना कर्तव्य बजाविण्याचे फर्माण सोडले जाते. मात्र नाईलाजास्तव चालक कर्तव्य बजातात. अन्येकदा 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या चालकांना रस्त्यावर उपाशी पोटी रात्र काढण्याची वेळ आल्याचे चालक सांगत आहेत. त्यामुळे भीतीपोटी चालक सायंकाळी वेळी मतांना घेऊन जाण्याचे टाळत आहेत.