हिंगोली : जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 73 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अशातच गुरूवारी वसमत तालुक्यातील कोठारी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्याच्या स्थितीमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जामुळे परिस्थिती डबघाईला
बद्रीनाथ पांडुरंग नरवाडे (वय ३० वर्षे. रा. कोठारी ता. वसमत) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नरवाडे यांच्या वडिलांकडे एकूण अडिच एकर शेती आहे. याच शेतीवर त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून 60 हजार रुपये कर्ज उचलले आहे. तसेच घर संसार चालविण्यासाठी मित्र व नातेवाइकाकडून पैसे उसने घेतले आहेत. मात्र पेरणीनंतर पावसाने ओढ दिली आणि नंतर अतिवृष्टी झाल्याने शेतातील हातातली उभे पीके जाण्याच्या मार्गावर आहेत. याच चिंतेमध्ये बद्रीनाथ गेल्या अनेक दिवसापासून राहत होते. अशाच त्यांना आपले घर कसे चालवायचे? हा प्रश्न पडला. याच नैराश्यातून त्यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
शेतात जाऊन येतो म्हणाले अन्...
बद्रीनाथ हे शेतामध्ये जाऊन पाहणी करून वेळेवर घरी परतत होते. नेहमीप्रमाणे ते शेतामध्ये जाऊन येतो असे म्हणून निघून गेले. मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परतले नव्हते. त्यामुळे शेतामध्ये जाऊन नातेवाईकांनी पाहणी केली. तर बद्रीनाथ यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच कुरूंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनिल गोपीनवार, सपोउपनी ए. टी. वाळके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अवघ्या दोन वर्षात 73 शेतकऱ्यांची आत्महत्या
हिंगोली जिल्ह्यांमध्ये शेतकरी हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामार ने तर सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. यामध्ये शेतकरी देखील अडकले आहेत. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे घर-संसार चालवायचा कसा? हा प्रत्येक शेतकऱ्यासमोर प्रश्न उभा ठाकला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी नैराश्यात जात आहेत. जवळपास या दोन वर्षांमध्ये तबल 73 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सन 2020 मध्ये एकूण 52 तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामध्ये 46 शेतकऱ्यांना शासनाकडून लाभ देखील मिळाला. 5 शेतकऱ्यांचे प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले आहेत. तर सन 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत 21 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये 12 शेतकऱ्यांना शासनाचा लाभ देण्यात आला आहे. तर एक शेतकरी मात्र अपात्र असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.