महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी जागून काढावी लागते रात्र - HINGOLI

सध्या हिंगोली जिल्ह्यातील २३ गावांची मदार ३४ टँकरवर अवलंबून आहे. प्रशासनाच्या वतीने प्रस्ताव आलेल्या गावात स्थळपाहणी केली जात आहे. त्यामुळे टँकरची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पाणीटंचाई

By

Published : Apr 22, 2019, 4:34 PM IST

हिंगोली - दरवर्षीची पाणीटंचाई ही हिंगोली जिल्ह्याच्या पाचवीलाच पुंजलेली आहे. ती यंदाही कायम आहे. दिवसेंदिवस एवढी भीषण पाणीटंचाई निर्माण होत आहे की, जिल्ह्यातील बऱ्याच गावात आज घडीला विहिरीत आत उतरून पाणी भरण्यासाठी रात्र जागून काढावी लागत असल्याचे भयंकर चित्र आहे. गावात आलेल्या टँकरचे पाणी भरण्यासाठी जीवाचे रान केले जाते. पाणी न मिळण्याच्या भीतीपोटी ग्रामस्थ टँकरवर चढून जीवाची जराही पर्वा न करता पाण्याचे पाईप टाकतात. शहरी भागात तर नळाचे पाणी कोणी नेऊ नये म्हणून चक्क कुलूप लावण्याची युक्ती वापरली जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

जिल्ह्यात याही वर्षी अत्यल्प प्रमाण झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आज घडीला जिल्ह्यातील प्रत्येक गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री जीवावर उदार होऊन ग्रामस्थ पाण्यासाठी विहिरीत उतरत असल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी, माळसेलु, डिग्रस कराळे, डिग्रस वाणी आदी गावात भीषण पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. बऱ्याच गावातील ग्रामस्थ केवळ पाणीटंचाईला कंटाळून शहरी ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. तर काहींनी कामानिमित्त बाहेरगावी धाव घेतली आहे. बऱ्याच गावांमध्ये केवळ वयोवृद्ध मंडळी उरली आहे. त्यांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आहे. नुकतीच लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असून, पाणीटंचाई निवारणासाठी अधिकारी कर्मचारी कामाला लागले आहेत. सध्या हिंगोली जिल्ह्यातील २३ गावांची मदार ३४ टँकरवर अवलंबून आहे. प्रशासनाच्या वतीने प्रस्ताव आलेल्या गावात स्थळपाहणी केली जात आहे. त्यामुळे टँकरची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे.

आजही रात्री अपरात्री पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. मालसेलू येथे तर गावाशेजारचे पाण्याचे सोर्स पूर्णतः कोरडे ठाक पडले आहेत. रेल्वे स्थानकावर असलेल्या एकमेव हातपंपावर गावची मदार आहे. याच ठिकाणी संपूर्ण गाव पाणी भरण्यासाठी येत असल्याचे आपला नंबर लवकर लागावा म्हणून रात्री पासूनच नागरिक पाण्यासाठी धाव घेत आहेत. याठिकाणी ग्रामस्थांची एवढी गर्दी असते की रात्री दोन वाजता भांडे घेऊन गेलेली व्यक्ती सकाळी साडेसात वाजता परत येत आहे. यावरून पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात येते. अशाच परिस्थितीत हिंगोली जिल्ह्यातील लोहगाव येथे एका शेतकऱ्यांने ग्रामपंचायतचे टँकर आडविल्याची माहिती ग्रामसेवक सुरेश झिंजाडे यांनी दिली तेव्हा नायब तहसीलदार माधव बोथीकर यांनी धाव घेतली.


या गावांची मदार टँकरवर -

कनका, लोहगाव, माळधावंडा, खापरखेडा, शिवनी खु, पोतरा, सिंदगी हातमाली मलालालीगी तांडा, जयपुर सेनगाव, कहाकर खुर्द, बाभुळगाव, पळसगाव, रामेश्वर संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, सेवादास तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, येहळेगाव या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही दिवसांनंतर टँकरची संख्या अजून वाढवावी लागेल, असे चित्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details