हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी वाहतुकीस बंदी घातलेली आहे. मात्र, अनेक जण विनाकारण बाहेर पडत आहेत. अशा रिकामटेकड्या 170 वाहनधारकांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यातील 20 वाहनचालकांकडून 90 हजार 200 रुपये दंड वसूल केला, तर सद्या 150 वाहने जप्त आहेत. एवढेच नव्हे तर वाहन धारकांना धडा शिकवण्यासाठी उठाबशा देखील करायला लावल्या.
विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांना हिंगोलीत वाहतूक शाखेचा दणका - lockdown
20 वाहनचालकांडून 90 हजार 200 रुपये दंड वसूल केला, तर सद्या 150 वाहने जप्त आहेत. एवढेच नव्हे तर वाहन धारकांना धडा शिकवण्यासाठी उठाबशा देखील करायला लावल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरात खबरदारी बाळगली जात आहे. विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण होता, तेव्हापासून प्रशासन जीव ओतून काम करत आहे. हिंगोली येथे रविवारी बरेच जण बाहेर फिरण्याचा आनंद घेत होते. अशांना मात्र वाहतूक शाखेने चांगलाच धडा शिकवला. यामध्ये काही दादा, बापूंचा ही समावेश होता. त्यांच्या दुचाकी तर जप्त केल्याच, मात्र खोट बोलून सुटका करून घेणाऱ्यांना उठाबशा करायला लावल्या. हा प्रकार पाहून अनेक दुचाकीस्वार पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. तर, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले जात होते.
एकंदरीतच वाहतूक शाखेने विनाकारण फिरणाऱ्यांना धडा शिकवल्याचे पहायला मिळाले. अशी कारवाई ही कायम राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ओंमकांत चिंचोळकर यांनी सांगितले. तर, एकाच दिवसात वाहने सोडून नेणाऱ्यांकडून 90 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच 150 वाहने वाहतूक शाखेने जप्त केलेली आहेत.