हिंगोली- कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याने, अनेक जण वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकून पडले आहेत. तर हिंगोली येथे अडकलेल्या अशा परप्रांतीय कुटुंबांची भूक भागविण्यासाठी नगरपालिका पुढे आली आहे. लातूर येथील प्रादेशिक कार्यालयाने अनेक उद्योजकाकडून संकलित केलेले अन्नधान्य हिंगोली नगर पालिकेने अनेक कुटुंबाना वाटप केले. त्यामुळे परप्रांतीय कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाची लागण झालेल्या रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. हा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. रस्त्यावर निघणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत. अशा परिस्थितीत परप्रांतीय अनेक कुटुंब जिल्ह्यातील विविध भागात अडकून पडले आहेत. त्यांची भूक भागविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. एवढेच नव्हे तर गुरांच्या चाऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून, वासवी सेवा भावी संघटनेच्या वतीने हिंगोली शहरातील मोकाट गुरांना चारा पाणी पुरवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
परप्रांतीयासाठी लातूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र वाहनाद्वारे गहू, तांदूळ, तूरडाळ व खाद्य तेल हिंगोली नगर पालिकेकडे सोपवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी धान्य स्वीकारून हिंगोली शहरात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतियांना वाटप केले. यामध्ये 250 किलो तांदूळ, 20 लिटर खाद्य तेल, 50 किलो तूरडाळ असे धान्य परप्रांतीय व्यक्तींना वाटप करण्यात आले. तसेच उर्वरित धान्य नगरपालिकेत ठेवण्यात आले असून शहरातील गायत्री पीठ येथे परप्रांतीय लोकांना भोजन पुरवण्यासाठी टप्या-टप्याने वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.
ऐन आपत्कालीन परिस्थितीत लातूर येथील प्रादेशिक अधिकारी कार्यालयाने अन्नधान्याची व्यवस्था केल्याने हिंगोली नगरपालिकेने प्रादेशिक कार्यालयाचे आभार मानले. तर परप्रांतीय कुटुंबाना धान्य दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले. शिवाय शहरात निराधार व्यक्तींनाही भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. भयंकर परिस्थितीतही उपाशी पोटी कोणी राहू नये यासाठी पालिका प्रयन्त करत आहे.