हिंगोली - शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात कोणी टक्केवारीची शंभरी गाठली तर कुणी सर्वच विषयात नापास झाले. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील नव्हलगव्हान येथील एका बहाद्दराने चक्क सर्वच विषयात ३५ गुण मिळवून दहावीत यश मिळविले. त्याच्या या 'कट टु कट' मिळवलेल्या गुणांनी परिसरात त्याचे कौतुक होत आहे. अनेक जण तर त्याच्या सोबत सेल्फी काढून सोशल मिडियावर टाकत आहेत.
सोपान वसंत कोरडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गावापासूनच तीन किमी अंतरावर असलेल्या भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयात शिक्षण घेत होता. दहावीत कमी गुण मिळाले. मात्र, बारावीत जास्त गुण घेऊन लॅब टेक्नीशियन होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. जास्त टक्के मिळालेल्या विद्यार्थांपेक्षा सगळ्या विषयात ३५ गुण घेणारा सोपानचा निकाल सर्वजण कुतुहलाने पाहत होते.