हिंगोली -यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यावरील आघाडीचे वर्चस्व कमी होऊन युतीची ताकद वाढू शकते, अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघात निर्माण झाली आहे. तसेच ऐन वेळी युती तुटल्यास वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या तीन मतदारसंघात चुरशीची लढाई होणार आहे. तसेच युती आणि आघाडी सोडून सुरुवातीपासूनच कामाला लागलेले काही इच्छुक तर ऐन वेळी कोणताही झेंडा घेऊन मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. तर काही संभ्रमात पडले असून त्यांना कोणता झेंडा घेऊ हाती अशीच काहीशी परिस्थिती झाली आहे.
हेही वाचा -आढावा मतदारसंघाचा : अतिसंवेदनशील 'अहेरी मतदारसंघात' तिरंगी लढतीची शक्यता
हिंगोली मतदारसंघावर १९९९ पासून काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हिंगोली मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. सध्या मुटकुळे यांची या मतदारसंघावर जबरदस्त पकड आहे. ही पकड विधानसभेत ही टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या मतदारसंघात अनेक जण ऐनवेळी कोणताही झेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सोडावा, यासाठी विधान परिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ताकतोडा येथे दाखल झालेल्या शिवस्वराज्य यात्रेत वरिष्ठांकडे याबाबत चर्चाही केली. त्यामुळे हा मतदार संघ नेमका राष्ट्रवादी की काँग्रेसकडे राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत?
या मतदारसंघात युती आणि आघाडीच्या व्यतिरिक्त निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज मुनीर पटेल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने ते काय करतात यावर सुद्धा येथील गणिते अवलंबून आहेत. तसेच पटेल यांचा मुलगा ही वंचितकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. त्यांच्यासह अनेक दिग्गज वंचितच्या संपर्कात आहेत. तर काही जण निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा खांद्यावर घेण्याच्या तयारीत आहेत.
हिंगोली मतदारसंघावर विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे वर्चस्व असून सद्या त्यांनी मतदारसंघात सर्वत्र भूमीपूजन कामाचा धडाका सुरू केला आहे. मात्र, 2-4 गावातील कामे सोडता बऱ्याच गावातील कामाला प्रत्यक्षात अजून सुरुवात झालेली नाही. त्यांनी मंदिर आणि सभागृह बांधण्यावर भर दिल्यामुळे इतर गोष्टी म्हणजे मतदार संघातील शाळांचा काया पालट केलेला नाही. त्यामुळे सभागृहात बसून मंदिरातील घंटा मतदारांनी वाजवावी का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
हेही वाचा -शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?