हिंगोली- कळमनुरी शहरातून कत्तलीसाठी जाणारे गोवंशाचे वाहन हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या वाहनात धारदार शस्त्रास्त्रे आढळून आले असून पाच गोवंशाचे जीव या कार्यकर्त्यांमुळे वाचले आहे. विशेष म्हणजे, सकाळी साडेसात वाजता ही घटना घडून देखील सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. मात्र उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी शेख कलिम शेख चाँद, शेख लिकायत शेख शौकत (दोघेही रा. पुसेगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोवंशाची तस्करी करणारे वाहन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत अवैध वाहतूक करणाऱ्या (एम.एच. ३८ एक्स ००४७) मालवाहू टेंम्पोला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरील वाहन चालकाने भरधाव वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी त्या वाहनाचा पाठलाग करुन त्याला अडविले.