महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात अखेर पावसाची दमदार हजेरी, वीज पडून २ जनावरे दगावली

यंदा जून संपत आला तरीही पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत होते. अशातच शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. काही भागातील वादळी पावसामुळे एक व्यक्ति गंभीररित्या जखमी झाला तर दोन गुरं दगावली.

जिल्ह्यात अखेर पावसाची जोरदार हजेरी

By

Published : Jun 21, 2019, 10:05 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील काही भागात आज प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा जून संपत आला तरीही पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत होते. अशातच शुक्रवारी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी झाला आहे. तर वांझोळा परिसरात वीज पडून एक गाय अन् म्हैस दगावली.

जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावली


हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट निर्माण झाले आहे. येथे घडीला 75 च्यावर टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जवळपास 90 हजार लोकसंख्या ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा जिल्ह्यात पाऊस चांगलाच लांबणीवर गेल्याने नागरिकांची पंचायत झाली. त्याहूनही भयंकर म्हणजे मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली. निसर्गाच्या अवकृपेमुळे शहरासह ग्रामीण भागातील पाणी प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.


वास्तविक पाहता दरवर्षी मृग नक्षत्रात पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे हळूहळू टँकरची संख्या कमी होत जाते. मात्र यंदा उलट परिस्थिती आहे. मृग नक्षत्र लागूनही पावसाचा एक थेंबसुद्धा न पडल्याने दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढत चालली आहे. तर अधिग्रहणाची संख्याही 539 वर पोहोचली आहे. अशाच परिस्थितीत हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्यास मदत झाली. शुक्रवारी हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी, बोल्डापूर तर सेनगाव तालुक्यातील काही गावात पावसाने हजेरी लावली.


कळमनुरी परिसरात मात्र वादळी वऱ्यासह हजेरी लावलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच खळबळ उडाली. सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊस सुरू असल्याने नागरिक पहिल्या पावसाचा आनंद घेण्याऐवजी आसरा शोधत होते. मात्र उशिरा का होईना प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या खरीप पेरणीसाठीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर वांझोळा येथील एकनाथ धवसे यांची दोन गुरे ठार झालीत अन धवसे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांचा एक पाय अन एक हात निकामी झाला आहे. त्याना फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविले. मात्र त्याठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांची गैरसोय झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details