हिंगोली - येथील हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था कोथळजच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात एकूण ५१ जोडपे विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे या ५१ जोडप्यांमध्ये एक पारधी समाजाच्या आणि अनाथ जोडप्याचाही समावेश होता.
समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी धडपडणाऱ्या पारधी समाजातील एक जोडपे या सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले. कधी नव्हे ते एवढया मोठ्या जनसमुदायाचा आशीर्वाद मिळाल्याने नव्यानेच विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्यासह त्यांच्या नातेवाईकांनींही समाधान व्यक्त केले.
मागील वर्षापासून हरिओम कृषी विकास संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी या विवाहसोहळ्यात अभिनेत्री किशोरी शहाणेसह राजकिय पुढारी तसेच शिवसेनेकडून नुकतीच उमेदवारी जाहीर झालेले आमदार हेमंत पाटील, आ. तान्हाजी मुटकुळे यांची उपस्थिती होती.
हिंगोलीत सामूहिक विवाह सोहळा संपन्न
या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन हरिओम कृषी विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप घुगे यांनी केले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे खरोखरच शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची भावनाही अनेकांनी व्यक्त केली. विवाहप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेली अभिनेत्री किशोरी शहाणे यांनीदेखील आपल्या जीवनाचा प्रवास सांगितला.
या विवाहसोहळ्यातील ५१ जोडप्यांना संसारासाठी उपयोगी असलेले साहित्य देण्यात आले. तसेच प्रमाणपत्रही देण्यात आले. शिवाय हजारोच्या संख्येने आलेल्या पाहुणे मंडळींची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. एकंदरीत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत मात्र अशा दानशूरानी समोर येऊन असे सामुदायिक विवाह सोहळे घेण्याची गरज आहे. जेणेकरून निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर मिळेल.