हिंगोली - प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात अजून 4 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. त्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हिंगोली जिल्हा हा कोरोना रुग्ण रिकव्हरी रेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर कसा राहील यासाठी प्रशासनाच्या वतीने अतोनात प्रयत्न केले जात आहेत. तर जिल्हाधिकारी देखील कोरोना योद्ध्यांकडे लक्ष ठेऊन आहेत. प्रशासन सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचे ही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. आता नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये एका डॉक्टरचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे.
हिंगोलीमध्ये आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह
हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या ही 332 वर पोहोचली असून, त्यापैकी 272 रुग्ण हे बरे झाले आहेत. आता 60 रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर तसेच कोरोना वार्डमध्ये उपचार सुरू आहेत.
नव्याने आढळले कोरोनाबाधित रुग्ण हे वसमत शहरातील सम्राट कॉलनी भागातील रहिवासी असून, रुग्ण हा वैद्यकीय व्यवसायिक आहे. हे एका कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. तसेच इतर रुग्ण हे हिंगोली शहरातील रिसाला बाजार आणि तलाब कट्टा भागातील रहिवासी आहेत. या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने, वयोवृद्ध आणि गर्भवती मातांसह मधुमेहाचा आजार असलेल्या 39 व्यक्तींचे थ्रोट स्वाब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी रिसाला बाजार भागातील 26 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर तलाबकट्टा भागातील 9 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, 2 जणांचे अहवाल हे रद्द केले आहेत. त्यामुळे ते परत पाठविण्यात येणार आहेत. या भागातील एका गर्भवती महिलेला आणि 60 वर्षिय वयोवृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. सोबतच गवळी पुरा भागातील एका महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, ही महिला पुणे येथून हिंगोलीत आली होती.