हिंगोली - जिल्ह्यात प्रशासनाच्यावतीने कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या भागात अँटीजन टेस्ट करण्यात येत आहेत. या तपासणीत 43 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. इतर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. एकाच दिवशी 54 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही 506 वर पोहोचली आहे. आता 167 रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूचे सामूहिक संक्रमण होण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अँटीजन टेस्ट करायला यापूर्वी प्रशासनाने नकार दिला होता. परंतु,आता कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या भागात आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना संशयितांची अँटीजन टेस्ट द्वारे तपासणी करण्यास सुरुवात झालीय.
हिंगोलीत 506 जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. तोफखाना भागात 121 पैकी 12, मंगळवारा भागात 95 पैकी 10, तलाबकट्टा 99 पैकी 4 अन आझम कॉलनी 94 पैकी 12 तर पेन्शनपुरा भागात 97 पैकी 5 असे एकूण 506 पैकी 43 जण तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह तर 463 हे निगेटिव्ह आढळले आहेत. यावरुन आता कोरोनाचे जिल्ह्यात संक्रमण वाढण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर मध्ये 11 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.