हिंगोली- जिल्ह्यात सलग 4 ते 5 दिवस पावसाने हजेरी लावलेली आहे. पेरणी योग्य झालेल्या या पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खरीप पेरणीची जोरदार लगबग सुरू झाली आहे. पेरणी ही मृगनक्षत्रातच व्हावी म्हणून, शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. मात्र ज्या शेतात वाकसा नाही अशा शेतात बैलजोडीच्या साह्याने पेरणी करून घेण्यात शेतकरी मग्न आहेत.
जिल्ह्यात पावणे 4 लाख हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. त्यापैकी एकट्या 2 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होते. यंदा योग्य वेळी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनची पेरणी वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या वतीने वर्तवली जात आहे. सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती. सलग पाच दिवस हजेरी लावलेल्या पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. पावसाने विसावा घेताच शेतकरी राजा झपाट्याने पेरणीच्या कामाला लागला आहे. वेळेत पेरणी आटोपली जावी म्हणून, शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहे, ट्रॅक्टरची मागणी वाढल्याने ट्रॅक्टरचे दर देखील वाढले आहेत.