हिंगोली- येथील हळदीच्या मोंढ्यात व्यापारी हळदीची हराशी एका ठिकाणी अन काटा दुसऱ्या ठिकाणी करत आहेत. याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी हळदीची विक्री थांबवून काटे ही थांबवले आहेत. त्यामुळे काही काळ हिंगोली येथील हळदीच्या मोंढ्यात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.
हिंगोली येथील संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीला चांगला भाव मिळतो त्याची रक्कमही वेळेत शेतकऱ्यांच्या हातात मिळत असल्याने, हे केंद्र सर्वदूर प्रसिद्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी हळद विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, येथे आल्यानंतर या कृषिउत्पन्न बाजार समितीचे खरे रूप समोर येते. या ठिकाणी 20 ते 25 हजार हळदीच्या पोते उतरवण्याची क्षमता आहे. त्यामुळे येथे कितीही पोते घेऊन आलेला शेतकरी परत माल वापस घेऊन जात नाही. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांची डोके दुखी ठरते ती एका शेडमध्ये हराशी अन दुसऱ्या शेडमध्ये काटा. हा भुर्दंड शेतकऱ्यावर लादला जात आहे. काहीवेळा शेतकरी एकटा असला तर त्याचा मालही लंपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल घेत ज्या ठिकाणी हराशी केली जाते त्याच ठिकाणी काटा करण्याच्या मागणी केली.