हिंगोली - जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी सव्वा नऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तर कुरुंदा परिसरात जमिनीतून गूढ आवाज आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपामुळे काही घरातील भांडी हादरली. मात्र, कुठे ही जमिनीला तडे, घरांची पडझड झाली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के - कुरूंदा
हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले.
भूकंपामुळे कुरुंदा भागात जवळपास ३ ते ४ सेकंद जमिनीतून गूढ आवाज येत होता. कळमनुरी तालुक्यातील हिवरा, कामठा फाटा, येलकी, येहळेगाव, जवळा पांचाळ या भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पांगरा शिंदे येथे नेहमीच भूगर्भातून येणारा आवाज यावेळेस मात्र आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत माहिती घेणे सुरूच होते. जिल्हा अधिकारी रुचेश जयवंशी यांनी वसमत तालुक्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे सांगितले. कुरुंदा आंबा गिरगाव बोराळा माळवटा कवठा या गावांमध्ये सौम्य धक्के जाणवले, त्यामुळे भयभीत झालेले ग्रामस्थ घराबाहेर पडले होते. मात्र, भूकंपामुळे जिल्ह्यात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे प्राप्त झाली नसली तरीही व्हॉट्सअँपवर मात्र, नुकसान झाल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरविल्या जात आहेत. त्यामुळे या अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.