हिंगोली -चीननंतर आता इतर देशातही कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा संशयित रुग्ण आता नांदेड जिल्ह्यातही आढळून आला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातही नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. नेहमीच भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारे औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनाकडेही कोरोनाच्या भीतीने भाविकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मंदिर परिसर पूर्णपणे ओस पडला आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या दर्शनासाठी नेहमीच भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. एवढेच काय तर नागनाथाच्या दर्शनास परराज्यातून भाविक येत असतात. नागनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय इतर अकरा ज्योतिर्लिंगाचे दर्शनच पूर्ण होत नाही. मात्र, गेल्या महिनाभरापासून कोरोना विषाणूने सर्वांनाच हादरून सोडले आहे. चीन मध्ये तर कोरोनामुळे अडीच हजारांच्यावर लोकांचा जीव गेला आहे. इतरही देशातही हळूहळू या रोगाचे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांना याची चांगलीच धास्ती घेतली आहे. बाहेरच्या वस्तूचा वापर टाळला जात आहे. तसेच तोंडावर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीसाठी देखील विक्रीस दाखल झालेले रंग खरेदीकडे लोक पाठ फिरवत आहेत.