हिंगोली -बेकायदेशीर दारू घेऊन जाणाऱ्या कार चालकाने रस्त्यावर थांबलेल्या पोलिसांच्या अंगावरच वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना वसमत-परभणी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अवैध दारू घेऊन जाणाऱ्या चालकाचा पोलिसाच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
एक धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील वसमत-परभणी रस्त्यावर घडला आहे. बेकायदेशीर दारू घेऊन जाणाऱ्या कार चालकाने रस्त्यावर थांबलेल्या पोलिसांच्या अंगावरच वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
नंदकिशोर द्वारकालाल जयस्वाल, असे कार चालकाचे नाव आहे. जयस्वाल हा परभणीकडून दारू घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वसमत तालुक्यातील तेलगाव फाट्यावर आलेल्या कारची तपासणी केली. जमादार गणेश लेकुळे यांनी चालकाचे नाव विचारले असता नंदकुमार जयस्वाल नाव सांगून गाडी सुरू करुन पळून जाण्याची तयारी केली. त्यावेळी लेकुळे गाडीसमोर उभे राहिले. मात्र, जयस्वालने त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून गाडीसमोरून बाजूला उडी घेतली. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे, तर काही अंतरावर जाऊन सदरील कार ही पलटी झाली. तरीही चालकाने अंधाराचा फायदा घेऊन, घटनास्थळावरून पलायन केले.
पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता, कारमध्ये 40 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी कारसह सव्वा सात लाख रूपयांचा ऐवज जप्त करून, जमादार गणेश लेकुळे यांच्या तक्रारीवरून नंदकिशोर जयस्वाल विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश सरोदे हे करीत आहेत.