हिंगोली -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभरात नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील आडगाव रंजे बुवा, जवळाबाजार आणि गोळेगाव या भागांतील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून फडणवीसांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
गोळेगाव येथे फडणवीस हे पाहणीसाठी शेतात जात असतानाच शेतमालक लक्ष्मण कुटे यांनी त्यांच्यासमोर हंबरडा फोडत नुकसानाची व्यथा मांडली. शेतकऱ्यांना धीर देत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहाणी केली. यावेळी बांधावर आलेल्या मंत्र्यांसमोर शेतकरी आर्थिक गणिते मांडण्याचा प्रयत्न करत होते. परतीच्या पावसाने पूर्णपणे आता खरीप हंगाम हातचा गेला असून, आता काय करावे, हे कळत नसल्याचे सांगत शेतऱ्याचा कंठ दाटून आला. तर यावेळी शेतकर्यासह फडवणीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या दौऱ्यामध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे तर स्थानिक भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.