हिंगोली- जिल्ह्यातील येहळेगाव परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास एक स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे अर्भक एक कुत्रा तोंडात धरून शिवारात फिरत होता. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्या मातेचा शोध घेत आहेत.
हिंगोलीत आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक; कुत्र्याने तोडले लचके - मृत
स्त्री जातीचे मृत नवजात अर्भक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे अर्भक एक कुत्रा तोंडात धरून शिवारात फिरत होता.
येहळेगाव परिसरापासून काही अंतरावरच एका झुडपामधून एक कुत्रा मृत नवजात अर्भक तोंडात घेऊन शिवारामध्ये पळत होता. हा प्रकार काही ग्रामस्थांच्या निर्दशनास आला. त्यांनी त्या कुत्र्याचा पाठलाग केला तर कुत्र्याने अर्भक एका शेतामध्ये सोडून पळ काढला. पोलीस पाटील सचीन मंदाडे यांनी घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. माहिती मिळताच जमादार सूर्य यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृत अर्भक ताब्यात घेऊन, कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे.
अर्भक साधारणता आठ ते नऊ दिवसाचे असल्याचा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस पाटील सचिन सिताराम मंदाडे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा अज्ञात महिलेविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्य हे करत आहेत. पोलीस परिसरातील रुग्णालय, तसेच घरी झालेल्या प्रसूती महिलांची माहिती घेत आहेत.