महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत मूकबधीर सालगडी वेदनेच्या छायेत...पोलिसांचे मात्र दुर्लक्ष - मूकबधिर हिंगोली

अंबादास हे मूकबधीर असून, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ते रोजनदारी करून पोटाची खळगी भरतात. मात्र, मुलगा शिकत असल्याने त्याच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. हा खर्च रोजंदारीवर भागवणे अशक्य होत आहे.

hingoli
हिंगोलीत मूकबधिर सालगडी वेदनेच्या छायेत

By

Published : Feb 14, 2020, 9:49 AM IST

Updated : Feb 14, 2020, 10:09 AM IST

हिंगोली- कामापुरता वापर करणारे अनेक लोकं आपल्याला भेटत असतात. काम संपले की, वाऱ्यावर सोडणारेही कमी नाहीत. असाच एक अनुभव मूकबधीर वयोवृद्ध असलेल्या एका सालगड्याला आला आहे. स्वतःवर झालेला अन्याय सांगण्यासाठी तो जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉटला खिळून पोलिसांची प्रतिक्षा करत आहे. मात्र, पोलीस तारीख पे तारीख देत त्याची भेट टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे माणुसकी आटत असल्याची खंत त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. अंबादास सोनाजी पाटील (रा. भिंगी) असे या सालगड्याचे नाव आहे.

हिंगोलीत मूकबधीर सालगडी वेदनेच्या छायेत...

काय आहे प्रकरण -

दरम्यान, अंबादास हे मूकबधीर असून, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. ते रोजनदारी करून पोटाची खळगी भरतात. मात्र, मुलगा शिकत असल्याने त्याच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे. हा खर्च रोजंदारीवर भागवणे अशक्य होत आहे. उसनवारी करून मुलाला पैसे पुरवले असून त्यामुळे डोक्यावर कर्ज झाले आहे. त्यामुळे हे कर्ज फेडायचे कसे, या प्रश्नाने हे कुटुंब चांगलेच गोंधळून गेले आहे. शेवटी नाईलाजास्तव गावातीलच शिवाजी आगलावे यांच्याकडे सालगडी म्हणून ते कामाला राहिले. नियमित शेतीसह सर्वच कामे ते करू लागले.

नेहमीप्रमाणे ते बैलाला चारापाणी करत असताना, 28 जानेवारीला त्यांना एका बैलाने जोराची धडक दिली. यात ते शेतात पडले. मात्र, ते मूकबधिर असल्याने त्यांना बोलता येत नव्हते. बैल त्यांना धडका देत होता. कशीबशी त्यांनी बैलापासून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर हा घडलेला प्रकार त्यांनी मालकाला इशारे करून सांगितला. मालकाने त्यांची गंभीर दखल घेतली नाही. पाटील जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार हा आपल्या पत्नीला सांगितला.

त्यानंतर पत्नीने अंबादास यांना हिंगोली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जवळ पैसे नसल्याने कसा बसा उपचार केला. खासगी रुग्णालयाचं बिल झेपावत नसल्याने त्यांनी त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. मात्र, गुपित ठिकाणी बैलाचे शिंग खुपसल्याने त्यातून रक्तप्रवाह सुरू झाला. पैशाने हतबल झालेल्या पत्नीने त्यांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 4 फेब्रुवारीला दाखल केले. तेथे एमएलसी दाखलही झाली. मात्र, अजूनही संबंधित बिट जमादारांनी या सालगड्याचा जवाब घेण्याची तसदी दाखवली नाही. अनेकदा नातेवाईकांनी बिट जमादाराला फोनवरून संपर्क साधून जवाब घेण्याची विनंती केली. मात्र, त्यांनादेखील याचा काहीच फरक पडला नाही. उलट त्या सालगड्याच्या पत्नीने काहीही तक्रार नसल्याचा जवाब दिल्याचे हा बिट जमादार सांगत होते.

दरम्यान, ही बाब उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. तेदेखील संबंधित सालगड्याच्या पत्नीला ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला देत आहेत. तर, पतीच्या दुःखाने व्याकुळ झालेली पत्नी पोलीस ठाणे शोधत शहरात फिरली. मात्र, पोलीस ठाणे न सापडल्याने ती थकून परत पतीजवळ जाऊन बसली.

त्यामुळे आजही बिट जमादार येतील अन् आमचा जवाब घेतील, याच प्रतिक्षेत हे दोघे पति-पत्नी रुग्णालयात बसले आहेत. मात्र, अजूनतरी एकाही पोलीस कर्मचाऱ्याने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे खरोखरच माणुसकी अटक असल्याचा अनुभव या जोडप्याला आला आहे. सालगड्याचा मालक हा उपचार घेत असलेल्या सालगड्याला दुःखात मदत करण्याचे सोडून, तुमच्याकडे पैसे किती फिरतात हे ठणकावून सांगत, पैसे फेडून देण्यासाठी तुझ्या मुलाला कामावर पाठवण्यासाठी धमकावत आहे. या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे.

Last Updated : Feb 14, 2020, 10:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details