हिंगोली- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे सर्वच पक्षाचे राजकीय नेते असल्याने जिल्ह्यातील राजकीय राजधानी म्हणून या गावाला ओळखले जाते. येथे प्रत्येक घरात नेते अन् कार्यकर्ते असल्याने नेहमीच कोणत्या ना कोण्यात कारणावरुन राजकारण तापत असते. असेच दोन दिवसांपूर्वी चिमुकल्याचा आहार शिक्षकांच्या मध्यस्थीने कोंबड्याच्या तोंडी देण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांमुळे वाचला आहे.
कोंबड्यांच्या तोंडी जाता जाता वाचला चिमुकल्याचा पोषण आहार! गोरेगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापकास काही नागरिकांनी हाताशी धरून चिमुकल्याच्या तोंडचा घास पळवण्याचा शनिवारी प्रयत्न केला. वटाने आणि तांदूळ एका वाहनाद्वारे बऱ्याच जणांच्या घरी व कुकुटपालनाच्या ठिकाणी ही पोहोचले आहेत. ही बाब काही सजग नागरिकांच्या लक्षात आली. त्यानंतर लगेच या आहाराची चौकशी करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हे धान्य कसे बसे शाळेत वापस आणले मात्र, गावाची बदनामी होऊ नये याची काळजी काही राजकारणी लोक घेत होते. हा प्रकार घडलाच नाही असेच दाखवून देण्याचा सर्वजण प्रयत्न करत होते.
विषेश म्हणजे यामध्ये सेनगाव येथे घेण्यात आलेल्या पाच वर्षपूर्ती कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केलेल्याही काही कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपची माळ गळ्यात पडताच कार्यकर्त्यांनी लगेच कामालाही सुरुवात केली, ती ही सामाजिक, धार्मिक नव्हे तर चक्क धान्य चोरीच्या. या खळबळजनक प्रकाराची जिल्ह्यात एवढी चर्चा रंगलीय की, जो तो पोषण आहाराचाच विचार करत आहे. आता या नाट्यमय वातावरणावर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यावर कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरून याच शालेय समितीचे अध्यक्ष, सदस्य म्हणतात की, तो झाडण्यातील तांदूळ आणि वटाणे होते.
शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाचा फायदा गोरेगाव शाळेसारखाच अनेक शाळेत घेतला जात असावा. मागील तीन महिन्यांपूर्वी वसमत तालुक्यातील शिरळी येथेही एका शालेय पोषण आहार वाटप करणाऱ्या वाहनातून चक्क गव्हाच्या कट्याची विक्री करत असताना ग्रामस्थांनी पकडून दिले होते.
एवढेच नव्हे तर ते वाहन अजूनही कुरुंदा पोलीस ठाण्यात लावलेले आहे. त्यानंतरही पोलीस प्रशासन अजूनही शिक्षण विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहे. दोन प्रकार गंभीर घडलेले असतानाही शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपचे निर्वाचित कार्यकर्ते कामाला लागल्याचा अनुभव गोरेगावकरांना आला आहे. ऑटोमधील पोषण आहाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.