हिंगोली- लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार एकमेकांवर कशा कुरघोड्या करतात याचे उदाहरण समोर आले आहे. अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळे यांनी आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद भाजपच्या एका नेत्यानेच आयोजित केल्याची बाब उघड झाली आहे.
हिंगोलीत उमदेवारांची एकमेकांवर कुरघोडी
हिंगोली लोकसभा अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळे यांनी आघाडीचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांनी वानखेडे यांची उमेदवारी रद्द करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. याबाबतची माहिती देण्यासाठी महायुतीच्या मिलिंद यबल यांनी पत्रकर परिषद प्रायोजित केली होती. या बनावाची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आता निवडणूक आयोग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून महायुतीचा कुटील डाव उघड झाला आहे. हिंगोली येथील रामकृष्णा लॉजमध्ये पत्रकार परिषद घेऊन उमेदवार त्रिशला कांबळेचे पती मिलिंद कांबळे यांनी रिट याचिका दाखल केली. या याचिकेनुसार काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी नामनिर्देशन दाखल करताना सर्व रकाणे पूर्ण भरून देणे बंधनकारक असताना अर्धवट अर्ज भरून दिल्याचा आरोप अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळे यांनी केला. तसेच वानखेडे यांनी पाच वर्षांचा प्राप्तिकर भरणा आणि आमदार, माजी खासदार म्हणून राज्य आणि केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या वेतनाबाबतचा तपशील शपथपत्रात दिला नाही. तरीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्ज स्वीकारला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून वानखेडे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली.
वास्तविक पाहता एखाद्या उमेदवाराच्या उमेदवारीवर आक्षेप हा उशिराने घेतला. तसेच स्वतःच प्रचार सोडून पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात निवडणुकीपूर्वीच प्रचार करण्यास सुरुवात केली. मात्र, याचा सर्व खरा प्रकार उमेदवाराच्या पतीने सांगितल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट उघड झाले आहे. ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली होती तेथील मॅनेजरने मिलिंद यबल यांनी ही पत्रकार परिषद बुक केली होती. त्यांचे नाव सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आता निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिलिंद यबल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही.