हिंगोली- देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरातील मंदिरे बंद करण्यात आली होती. 'मिशन बिगिन अगेन'च्या पहिल्या टप्प्यात देशातील सर्व मंदिरे उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाचे मंदिर आजही बंद आहे. मंदिर उघडण्यासाठी शासनाच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेची प्रतीक्षा करीत असल्याची माहिती नागनाथ मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.
औंढा नागनाथ मंदिर बंदच; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा - औंढा नागनाथ मंदिर हिंगोली
देशभरात आजपासून धार्मिक स्थळे आणि मंदिर उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, हिंगोलीत औंढा नागनाथ मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात एका हॉटेल चालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी धार्मिक स्थळे, मंदिर बंद ठेवण्याचे आदेश शासनाने काढले होते. त्यानुसार जिल्ह्यातील औंढा नागनाथचे मंदिरदेखील बंद ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली असली तरी त्याबद्दचे अंतिम निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील. त्यामुळे मंदिर उघडण्यासाठी शासनाच्या सूचनेची तसेच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशाची प्रतीक्षा करत असल्याचे तहसीलदार माचेवाड यांनी सांगितले.
नागनाथ मंदिर परिसरातील एका हॉटेल चालकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा भाग संपूर्णपणे सील करण्यात आला असून विशेष खबरदारी घेतली जात आहे. संसर्ग पसरू नये, यासाठी प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. मंदिर उघडल्यानंतर येथे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिराचे द्वार उघडण्यासंदर्भात विचार केला जाणार असल्याचे तहसीलदार माचेवाड यांनी सांगितले.