हिंगोली - यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे असतांना विमा कंपनीकडून केवळ नुकसान भरपाई म्हणून 1800 रुपयांची रक्कम दिली गेली. विमा कंपनीने नियमाप्रमाणे रक्कम द्यावी, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मिळालेली रक्कम मुख्यमंत्र्यांना धनादेशाद्वारे परत केली आहे.
पिक विम्याची रक्कम धनादेशद्वारे मुख्यमंत्र्यांना परत-
हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी 124 टक्के पाऊस झाला. या पावसामुळे खरीप हंगामातील तूर, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यंदा तबल 3 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. सर्वाधिक जास्त सोयाबीन या पिकाचा पिक विमा काढण्यात आला होता. यासाठी विमा कंपनिकडे प्रति हेक्टर 900 रूपयांची रक्कम भरली होती. एका अर्जासाठी शेतकऱ्यांना 200 रुपये मोजावे लागले होते. हा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना फार खस्ता खाव्या लागल्या होत्या. त्याला यश आले मात्र हातात खुप कमी रक्कम मिळाली आहे. या रक्कमेतून भांडवली खर्च ही निघेनासा झाला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मिळालेली पिक विम्याची रक्कम धनादेशाद्वारे मुख्यमंत्र्यांना परत पाठवली आहे.
40 ते 45 हजाराची हेक्टर मागणी-
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. आशा बिकट परिस्थितीत नेमकं काय करावं, काही ही सूचेनाशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढी भयंकर परिस्थिती असताना, हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा परिसरातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टर 1800 रुपये एवढीच पिक विम्याची रक्कम दिलेली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब आडकीने व उद्धव गावंडे यांनी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून विमा कंपनीकडून मिळालेली 1800 रुपयांची रक्कम ही मुख्यमंत्र्यांना धनादेशाद्वारे पाठविली आहे. तसेच नियमाप्रमाणे रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.
हेही वाचा-सत्तासुंदरी हातातून निसटल्यामुळे शेलार आणि दरेकर 'देवदास' झालेत- राजू शेट्टी