हिंगोली -संपूर्ण आयुष्य विध्यार्थी घडवण्यात घालवल्यानंतर एका निवृत्त शिक्षकाने कोणाचे ओझे न बनता, शेती करण्यास सुरुवात केली आहे. यात त्यांनी कोबी आणि झेंडूची लावगड करून, झेंडूच्या फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे. शेतीच्या कामासाठी ते ट्रक्टरही चालवायला शिकले आहे. नाथराव जाधव (रा. केंद्रा खु) असे या शिक्षकाचे नाव आहे.
जाधव यांना पूर्वीपासूनच शेतीची आवड होती. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. शेतकरी कुटुंबाचा वारसा असल्याने इच्छा नसतानाही त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. घरी मोठ्या प्रमाणात असलेली शेती आणि शिक्षकाची नौकरी, हे समीकरण काही जुळत नव्हते. तरी देखील ते कसेबसे शेतीकडे लक्ष देत रहायचे. अशा परिस्थितीमध्ये ते दोन वर्षापूर्वी निवृत्त झाले आणि त्यांच्या मनासारखे सर्वकाही झाले.
निवृत्त होताच जाधव यांनी आपला मोर्चा थेट शेताकडे वळवला. त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन शेती केली. ते दरवर्षी शेतात वेगवेगळे प्रयोग करू पाहातात. यातून त्यांना चांगला नफा देखील होतो. यावर्षी देखील त्यांनी भाजीपालावर्गीय शेती बोरबरच झेंडूची लागवड केली. यातून त्यांनी चांगला नफा कमवला आहे.
खडूचे हात झिजताहेत ट्रॅक्टर स्टेअरिंगसाठी
विद्यार्थी घडवण्यासाठी जाधव यांनी आपले उभे आयुष्य घातले. त्यांच्या हाताखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज मोठ-मोठ्या पदावर आहे. मात्र, खडू धरणारे हात आता ट्रॅक्टरची स्टेअरिंग धरत आहेत. शेती जास्त असल्याने, बैलावर शेती करणे अशक्य होते. त्यामुळे, जाधव यांनी ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टर चालवायला शिकले. ते शेताचे काम करण्यासाठी अजिबात कोणावरही अवलंबून राहात नाही. तर, स्वतः सर्व शेतीची कामे करत असल्याने शेती देखील चांगल्या प्रकारे फुलली आहे.