हिंगोली- क्वारंटाईनचे १४ दिवस संपल्यानंतर सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना माळहिवरा येथे घडली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरदेखील जबर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मुरलीधर भोकरे, मेश्राम भोकरे, अर्चना भोकरे, बनशिराम भोकरे अशी जखमीची नावे आहेत. मुरलीधर यांची पत्नी कविता या औरंगाबाद येथे त्यांच्या मुलीकडे गेल्या होत्या. त्या महिना भरापूर्वी मुलीसह माळहिवरा येथे आल्या होत्या. त्यांनी शासकीय आरोग्य विभागात तपासणी केली असता, डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यानुसार पती, पत्नी अन् मुलगी हे कुटुंब शेतात राहत होते. त्यांचा 14 दिवसाचा कालावधी संपल्याने ते सरपंच, पोलीस पाटील यांना कळवून गावात राहायला आले होते.
क्वारंटाइननंतर सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास गेलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण
क्वारंटाइनचा कालावधी संपल्यानंतर सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
गावात असलेल्या सार्वजनिक विहिरीवर मुरलीधर हे पाणी भरण्यासाठी गेले असता, गावातील काहींनी त्यांना पाणी नेण्यासाठी विरोध केला आणि अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये मुरलीधर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, कानातून अन नाकातून रक्त बाहेर येत होते. भांडण सोडवण्यासाठी आलेल्यांनादेखील जबर मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये तिघांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, मुरलीधर भोकरे यांची प्रकृती गंभीर असल्याने, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. तर इतर तिघांवर सामान्य रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. तर समोरील व्यक्तीदेखील जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ग्रामीण भागातदेखील कोरोनाने शिरकाव केल्याने गावांमध्ये चांगलेच वादळ उडाले आहे. काही गावांमध्ये शेतकरी पिण्याचे पाणी अडवत आहेत, तर काही ठिकाणी बाहेरून आलेल्या लोकांना मारहाण करण्याच्या घटनादेखील घडत आहेत. बुधवारी वसमत तालुक्यातील हटा येथे अशीच एक घटना घडली. त्यामुळे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुन्हा अशीच घटना माळहिवरा येथे घडली आहे.